‘ ई-शिष्यवृत्ती’ साठी सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज भरण्यास सुरुवात

‘ई-शिष्यवृत्ती’ साठी सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज भरण्यास सुरुवात

        सामाजिक न्याय विभागाच्या भारत सरकार मॅटिकोत्तर शिष्यवृत्ती (ई-स्कॉलरशिप) योजनेसाठी सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तेव्हा महाविद्यालयांमध्ये नव्याने प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या https://mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर त्वरित ऑनलाईन अर्ज भरावेत. असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक श्री.काशिनाथ गवळे यांनी केले आहे.
        अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षी ऑनलाईन अर्जांचा भरणा केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आधारकार्ड काढणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्याच खात्यात जमा होण्यासाठी त्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावा. तसेच शिष्यवृत्तीचा/ शिक्षण फी परीक्षा फी चा ऑनलाईन अर्ज भरताना सुद्धा अचूक आधार क्रमांक बँकेचा खाते क्रमांक विसरता लिहावा. ज्यामुळे आपली शिष्यवृत्ती आपल्याच खात्यावर जमा होईल.
       नाशिक विभागात दरवर्षी २ लाख  ५० हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करतात. अशा विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपले राष्टीयकृत बँकेतील वैयक्तीक खाते आधारकार्डशी लिंक करुन घ्यावे. यामुळे आपल्या खात्याची रक्कम इतरत्र वर्ग होणार नाही. जेणेकरुन शासनाच्या शिष्यवृत्ती वाटपाच्या प्रक्रियेत ही गतिमानता येईल. विद्यार्थ्यांनी आपल्या बँक खात्यातून किमान तीन महिन्यातून एका वेळेस व्यवहार (Transaction) करावा. अन्यथा आपले बँक खाते गोठविण्यात येते. त्यामुळे आपली शिष्यवृत्ती खात्यात जमा न होता समाज कल्याण विभागाकडे परत येत असते. महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे. ज्या विद्यार्थ्यांचे अद्याप आधारकार्ड काढले नसतील त्यांचे आधारकार्ड काढण्यासाठी महाविद्यालयांनी कॅम्प आयोजित करावा. तसेच महाविद्यालयांनी त्यांच्यास्तरावरील प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे पाठवावेत.
शिष्यवृत्ती अर्ज भरतांना लागणारे आवश्यक कागदपत्रे :- भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरता खालील कागदपत्रे आवश्यक असतात. तेव्हा विदयार्थ्यांनी ऐनवेळेस धावपळ करण्यापेक्षा खालील कागदपत्रे अर्ज भरतांना तयार ठेवावीत.
१) दहावी/बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रिका/मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या परीक्षेची गुणपत्रिका.
२) जातीचा दाखला. ३) जाती प्रमाणपत्र पडताळणी दाखला. ४) आधारकार्ड क्रमांक
५) ज्या राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडले आहे. तो बँक खाते क्रमांक,बँकेचा IFS कोड,MICR कोड

६) सक्षम अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला. ७) पासपोर्ट आकाराचा फोटो. वरील कागदपत्रे सोबत ठेवून शिष्यवृत्ती चा ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांनी करावा. पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खात्यावर परस्पर जमा केली जाते. यासाठी बँक खाते क्रमांक व आधार क्रमांक अत्यावश्यक आहे. विदयार्थ्यांचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क त्यांनी ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. त्या महाविद्यालयाच्या बँक खात्यावर परस्पर जमा केले जाते. अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षीच विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यानंतर अभ्यासक्रम पुर्ण होईपर्यंत अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. असे आवाहन श्री.काशिनाथ गवळे यांनी केले आहे.

टिप्पण्या