अनुसूचित जातीच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्त्या

अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे, शिक्षण घेताना त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी विविध शिष्यवृत्या महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येतात. या शिष्यवृत्तींविषयी माहिती देणारा हा लेख...
माध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
इयत्ता 5 वी ते 7 वीमधील 2 गुणवत्ताधारक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तसेच इयत्ता 8 वी ते 10 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिल्या दोन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी मान्यताप्राप्त प्राथमिक/माध्यमिक शाळेतील इयत्ता 5 वी ते 10 वीच्या वर्गामध्ये शिकणारा मागासवर्गीय विद्यार्थी असावा.

ही शिष्यवृत्ती मागील वार्षिक परीक्षेत कमीत कमी 50 टक्के व त्याहून अधिक गुण मिळवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम व द्वितीय क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या गुणवत्ता प्रदान मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मंजूर करण्यात येईल. या शिष्यवृत्तीसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उत्पन्नाची अट राहणार नाही. यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शाळेतील नियमित हजेरी, समाधानकारक प्रगती व चांगली वर्तणूक असल्यास मंजूर करण्यात येईल.

ही शिष्यवृत्ती दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या कालमर्यादेपुरतीच म्हणजे जून ते मार्च या 10 महिन्यांसाठी मंजूर करण्यात येईल. ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यासाठी सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक व माध्यमिक शाळांकडून गुणवत्ता प्रदान मागासवर्गीय विद्यार्थ्यांची माहिती मागविण्यात येईल. सदरहू शिष्यवृत्ती जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद मंजूर करतील.

या योजनेअंतर्गत इयत्ता 5 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 50 रुपयांप्रमाणे 10 महिन्यांच्या कालावधीसाठी 500 रुपये देण्यात येतील तर 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 100 रुपयांप्रमाणे 10 महिन्यांच्या कालावधीसाठी 1000 रुपये देण्यात येतील.

या शिष्यवृत्ती योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क साधता येईल.
भारत सरकार शिष्यवृत्ती

• मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेता यावे, विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने ही शिष्यवृत्ती देण्यात येते.
• ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
• विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रूपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
• विद्यार्थी शालांत परिक्षोत्तर व त्यापुढील शिक्षण घेत असलेला असावा.
• विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
• या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यास निर्वाह भत्ता व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर मान्य बाबींवरील शुल्क प्रदान करण्यात येते.
• दरमहा 230 ते 450 रूपये या दराने निर्वाह भत्ता देण्यात येतो.
• वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा 380 ते 1200 रूपये निर्वाहभत्ता देण्यात येतो.
• या योजनेसाठी http//mahaeschool.maharashtra.gov.in या वेबसाईटवर online अर्ज भरणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी संबंधीत जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण तसेच संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा.
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

• अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, तसेच सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये ते टिकून रहावेत, यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
• यासाठी इयत्ता 10 वीमध्ये 75 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून इयत्ता 11 वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.
• ही शिष्यवृत्ती योजना इयत्ता 11 वी 12 वीमध्ये शिकणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयातील अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी आहे.
• इयत्ता 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 300 रुपयांची शिष्यवृत्ती 10 महिने कालावधीसाठी देण्यात येते. या योजनेसाठीhttp//mahaeschool.maharashtra.gov.in या वेबसाईटवर online अर्ज भरणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा.
शाहू महाराज देशांतर्गत शिष्यवृत्ती
एकविसाव्या शतकामध्ये यशस्वी होण्यास अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे कौशल्य व ज्ञान उपलब्ध व्हावे व त्यांची स्पर्धात्मक युगामध्ये जडणघडण व्हावी, याकरिता देशातील उत्तमोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. राज्यातील 100 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देशातील नामांकित व शासनमान्य शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना देण्यात येते.
अटी व शर्ती
या योजनेअंतर्गत लाभ घेणारा विद्यार्थी हा अनुसूचित जाती/नवबौद्ध व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थ्यांच्या पालकांचे सर्व मार्गांनी वार्षिक उत्पन्न 4.50 लाखापर्यंत असावे. या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने मान्य केलेल्या संस्थेत प्रवेशित असावा.
लाभाचे स्वरुप
संस्थेचे आकारणी केलेले शैक्षणिक शुल्क, वसतिगृह व भोजन शुल्क, क्रमिक पुस्तके व शैक्षणिक साहित्य यांच्या खर्चासाठी प्रतिवर्षी 10 हजार रूपये.

वरील दोन्ही योजनांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात येतात. अधिक माहितीसाठी आयुक्त, समाज कल्याण महाराष्ट्र राज्य, पुणे-1 यांच्याशी संपर्क साधावा.
परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे, अशा 50 (पीएच.डी.-24 व पदव्युत्तर-26) परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.

अटी व शर्ती

  • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • विद्यार्थ्याचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मात्र पीएच.डी.साठी ही मर्यादा 40 वर्षांची राहील.
  • विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 50 टक्के गुण व प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण असावा. विद्यार्थ्याने परदेशातील विद्यापीठात प्रवेश घेतलेला असावा.
  • परदेशातील विद्यापीठ हे मान्यताप्राप्त विद्यापीठ असावे.
  • पदव्युत्तर पदवीमध्ये अभ्यासक्रमासाठी पदवीला किमान 50 टक्के गुण आवश्यक व प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.
  • परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती/नवबौद्ध घटकातील असावा.
लाभाचे स्वरुप
  • विद्यार्थ्याला वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रासाठी यु.एस.डॉलर 14 हजार तर यु.के.साठी 9 हजार पौंड इतका अदा करण्यात येतो.
  • विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी यु.एस.ए. व इतर देशासाठी यु.एस.डी. 1375 तर यु.के.साठी 1 हजार पौंड इतके देण्यात येतात.
  • पुस्तके, अभ्यासदौरा इत्यादी खर्चाचा यात समावेश आहे.
  • विद्यार्थ्याला परदेशात जाताना व अभ्यासक्रम झाल्यानंतर परत येताना विमान प्रवासाचा खर्च (Shortest Route & Economy Class) तिकीट सादर केल्यानंतर मंजूर करण्यात येतो.
  • विद्यापीठाने प्रमाणित केलेली शिक्षण फीची पूर्ण रक्कम व इतर खर्च मंजूर करण्यात येतो.

टिप्पण्या