लोकशाहीच्या कर्तव्यासाठी दिव्यांग बांधव सज्ज !
विभागात 50 हजार
दिव्यांग मतदारांची नोंद
कोणाला हात नाही….
कोणाला पाय नाही…. तर कोणाला बोलता येत नाही…. तर कोणाला दिसत नाही....असे हरतऱ्हेचे
दिव्यांगत्व वाट्याला आलेले आहे. असे असतांनाही मनात मात्र एक उत्साह, उमंग घेऊन दिव्यांग
मतदार सुर्दृढ व समर्थ लोकशाही घडविण्यासाठीचे आपले कर्तव्य निभावण्यासाठी सज्ज झाला
आहे.
महाराष्ट्र विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक – 2019 सदस्यपदांच्या निवडणुकीसाठी सोमवार, दिनांक 21 ऑक्टोंबर 2019 रोजी नाशिक विभागातील
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव व अहमदनगर या पाचही जिल्हयात एकूण 50918 दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे.
जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी मतदान करावे. यासाठी निवडणुक प्रशासन सरसावले आहे.
निवडणुक प्रशासनाच्या मदतीला विभागातील अनेक दिव्यांग स्वयंसेवी व सेवाभावी संस्थाही
धावून आल्या आहेत. जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी मतदान करावे. यासाठी पाचही जिल्हयातील
दिव्यांग संस्थांच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी कार्यशाळांचे
आयोजन केले आहे. गावा-गावात जाऊन मतदानांविषयी जनजागृती करत आहेत. पथनाट्य, भित्तीपत्रके, रॅली, कार्यशाळा व बैठका
यांच्या माध्यमातून दिव्यांग मतदारासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे.
नाशिक विभागातील
47 विधानसभा मतदार संघातील 4937 ग्रामपंचायती मधील 13990 मतदान केंद्रावर दिव्यांग
मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. दिव्यांग
शाळा/कर्मशाळेतील लिपीकवर्गीय कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीना दिव्यांग
व्यक्तींच्या घरोघरी जाऊन दिव्यांग मतदार नोंदणी करून घेतली. यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचे
मार्गदर्शन व सहाय्य घेण्यात आले. यासाठी दिव्यांग व्यक्तींना सहाय्य व मार्गदर्शन
करण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयामध्ये ‘स्वतंत्र कक्ष’ तयार करण्यात आला. विभागातील
सर्व बस स्टँड, रेल्वे स्टेशन, टोल नाके व अन्य गर्दीच्या ठिकाणी दिव्यांग मतदार नोंदणीसाठी
माहिती देण्यासाठी व निवडणूकी संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र ‘दिव्यांग कक्ष’
तयार करण्यात आले. दिव्यांग मतदार नोंदणी करिता विविध माध्यमातून प्रसिध्दी देण्यात
आली. नाशिक विभागात नाशिक - 12135, धुळे - 6373,
नंदुरबार - 2828, जळगांव - 14972 व अहमदनगर - 14610 असे एकूण 50918
दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. यात अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद व इतर
व्याधी असलेल्या दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.
यासर्व दिव्यांग
मतदारांपैकी ज्या दिव्यांग मतदारांना स्वत:हून मतदान केंद्रावर जाणे शक्य होणार नाही.
अशा मतदारांसाठी निवडणुक प्रशासनाने 13990
मतदान केंद्रावर 1319 वाहने व 4829 दिव्यांग साधने (व्हील चिअर, वॉकर, काठी आदी)
ची व्यवस्था केली आहे. मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी चारचाकी, दुचाकी वाहनासोबत मदतनीस
, विशेष मदतनीस, ब्रेल लिपीची आवश्यकता असलेल्या मतदारांना आवश्यक सुविधा पुरविण्यात
येणार आहेत. यासाठी दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व स्वयंसेवी व सेवाभावी संस्थांची
ही मदत घेण्यात येत आहे.
लोकशाही व निवडणुक
प्रक्रीयेमध्ये दिव्यांग व्यक्तींचा सहभाग वाढविणेसाठी राज्याचे मुख्य सचिवांनी राज्यातील
सर्व महसूल विभागीय आयुक्तांची ‘समन्वयक अधिकारी’ म्हणून नियुक्त केली आहे. तर समाज
कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्तांची ‘सह समन्वयक अधिकारी’ म्हणून नियुक्ती केली
आहे. नाशिक विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने यांनी नाशिक विभागातील दिव्यांग मतदारांसाठी
नियुक्त सर्व नोडल अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी आढावा बैठका घेतल्या आहेत. विभागीय आयुक्तांच्या
मार्गदर्शनानुसार समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर यांनी नाशिक विभागातील
सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना दिव्यांग मतदारांना सुविधांच्या बाबतीत दक्ष
राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिव्यांग मतदारांना
निवडणुक प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी. यासाठी
प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था, पिण्याचे पाणी, वैद्यकिय पेटी, दिव्यांग
मतदार सुविधा भित्तीपत्रके व अल्पोहार आदींची व्यवस्था प्रत्येक जिल्हा निवडणुक प्रशासनाच्या
वतीने करण्यात येणार आहे. अंध मतदारांसाठी
ब्रेल लिपीतील मतपत्रिकेची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
जास्तीस जास्त
दिव्यांग मतदारांनी जागृत राहून लोकशाहीच्या या उत्सवात आपले अमूल्य मतदान करून आपला
सहभाग नोंदवावा.असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केलेले आहे.
सुरेश पाटील
(जनसंपर्क
अधिकारी)
प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक
प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक
टिप्पण्या